पहलगाम हल्ल्याचा कतार, जॉर्डनसह अरब लीगकडून निषेध   

नवी दिल्ली : कतार, जॉर्डन, इराक आणि दिल्लीतील अरब लीग मिशनने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारतासोबत एकता व्यक्त केली आहे. 
 
पहलगाममधील हल्ल्यानंतर अनेक देश आणि त्यांच्या सरकारांकडून भारताला एकतेचे संदेश आले आहेत. लीग ऑफ अरब स्टेट्सच्या दिल्ली मिशनने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात या घृणास्पद हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, या दु:खाच्या प्रसंगी ते भारत सरकार, भारतातील लोक आणि शोकग्रस्त कुटुंबांप्रति तीव्र संवेदना व्यक्त करतात.
 
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात पीडितांच्या कुटुंबियांबद्दल आणि भारत सरकार आणि मृत नागरिकांंप्रति शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममधील हल्ल्याचा कतार तीव्र निषेध करतो. हिंसाचार, दहशतवाद आणि गुन्हेगारी कारवायांविरोधात कतार नेहमीच भारतासोबत राहील. 
 
इराकच्या परराष्ट्र मंत्रालयानेही हल्ल्याचा निषेध करत या कठीण काळात भारतासोबत एकता व्यक्त केली आहे. जॉर्डनच्या परराष्ट्र व्यवहार आणि प्रवासी मंत्रालयानेही या हल्ल्याचा निषेध नोंदवत भारताला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.  
 

Related Articles